पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली   

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी (२२ एप्रिल) दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी केला. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामागील संशयित दहशतवाद्यांचे छायाचित्र आणि रेखाचित्र सुरक्षा यंत्रणांनी जारी केले. फोटोत असलेल्या चौघांपैकी तीन दहशतवाद्यांची ओळख पटली असून आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी त्यांची नावे आहेत. 
 
पहलगाम येथील बैसरन कुरणात पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. दहशतवादी गट लष्कर ए तैयबाची शाखा असलेल्या 'दि रेझिस्टन्स फ्रंट'चे हे सदस्य असल्याचे म्हटले जाते. दरीच्या सभोवतालच्या घनदाट पाइन जंगलातून कुर्ता पायजमा घातलेले किमान ५ ते ६ दहशतवादी बैरसन कुराणात आले. त्यांनी एके ४७ ने गोळीबार केला. गुप्तचर संस्थांनी या हत्याकांडाचा सूत्रधार सैफुल्लाह कसुरी उर्फ ​​खालिदचीही ओळख पटवली आहे. तो लष्कर-ए-तोयबाचा एक प्रमुख कमांडर होता. जंगलाचा फायदा घेऊन पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली आहे आणि हेलिकॉप्टर तैनात केले आहेत.

हल्लेखोरांची दुचाकी पोलिसांच्या ताब्यात

भारताची गुप्तचर यंत्रणा देखील अलर्टवर असून ते या दहशतवाद्यांची माहिती गोळा करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून नंबर प्लेट नसलेली एक संशयास्पद दुचाकी जप्त केली आहे. दहशतवादी याच दुचाकीवरून बैसरन येथे आले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
दोन दहशतवाद्यांनी एम ४ कार्बाइन असॉल्ट रायफल बाळगल्या होत्या तर इतर दोघांनी एके-४७ रायफल बाळगल्या होत्या. “कुरणात पोहोचल्यानंतर, दहशतवाद्यांनी प्रथम बंदुकीच्या धाकावर पर्यटकांना ओलीस ठेवले आणि नंतर सर्व महिला आणि मुलांना दूर राहण्यास सांगितले. ओळख पटवल्यानंतर त्यांनी जवळून गोळीबार केला. नंतर त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला”, असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले. 
 

Related Articles